
भक्तिवेदान्त हॉस्पिटलच्या विभिन्न सामाजिक तसेच आध्यात्मिक कार्यांचा एक आढावा.
-मुकुन्दमाला दास
“मी आपणास वचन देतो की एके दिवशी मी निश्चितपणे भारतीय लोकांसाठी काहीतरी उत्तम कार्य करेन. खरे सांगतो, मी आपल्या लोकांची मदत करेन. मला एकच संधी द्या.” पायी चालत अमेरिकेतून भारताच्या सीमेवर पोहोचलेले युवक, रिचडॅ स्लॅविन यांनी भारत-पाक सीमेवरील हुसैनीवाला नाक्यावर पोहचल्यावर एका शिख अधिकार्यासमोर हे शब्द उच्चारले. त्या अधिकार्याने थोडावेळ विचार करून रिचर्ड यांच्या पासपोर्टवर शिक्का मारून त्यांना या देवभूमीत प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली. आगामी काळात ते प. पू. राधानाथ स्वामी या रूपात उदयास आले. त्यांनी गोवर्धन इकोविलेज, गोपालस् गार्डन, अन्नामृत अशा अनेक योजनांद्वारे भारतीय लोकांची आपल्या वचनांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात सेवा केली आहे. त्यांच्या अनेक योगदानांपैकी एक आहे, भक्तिवेदान्त हॉस्पिटल. माझ्या मनात नेहमीच या हॉस्पिटलविषयी कुतुहल होते आणि अंतत: काही आठवड्यांपूर्वी मला तेथे प्रत्यक्षपणे जाण्याची संधी मिळाली.
मी ऐकले होते की या हॉस्पिटलच्या प्रमुख उद्देशांमध्ये लोकांच्या आरोग्याबरोबर त्यांची आध्यात्मिक सहाय्यता करण्याचा देखील समावेश होता. याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आज मी भक्तिवेदान्त हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या ओ.पी.डी. (बाह्य-रुग्ण विभाग) समोर बसलो होतो. मला आठवते की एका प्रवचनात श्रील प्रभुपाद म्हणाले होते, “या जगात हजारो हॉस्पिटल आहेत; परंतु आत्म्याचा उपचार करणारे हॉस्पिटल कुठे आहेत? हे हरे कृष्ण मंदिर भवरोगाने ग्रसीत आत्म्यांसाठी असलेले हॉस्पिटल आहे. (टाऊन हॉल, 14 एप्रिल – 1972, ऑकलंड)
जर मंदिर हॉस्पिटलचे कार्य करीत असेल तर हॉस्पिटल देखील मंदिराचे कार्य करू शकते का?

हॉस्पिटलचे बाहेरून दिसणारे दृश्य अत्यंत मनोहारी होते. हॉस्पिटलची इमारत बाहेरून एका मंदिराची आठवण करून देत होती. बाहेरील भिंतीवरील हलका गुलाबी रंगाने मला श्रीधाम मायापूर स्थित इस्कॉन मंदिराची आठवण झाली. हॉस्पिटलच्या आत भिंतीवरील भगवान श्रीकृष्णांच्या लीलांशी संबंधित चित्रे संपूर्ण वातावरणाला दिव्य बनवित होती. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच समोर सर्वप्रथम श्रील प्रभुपादांचे मूर्तीचे दर्शन होते. सागवानी लाकडापासून बनविलेल्या नक्षीदार सिंहासनावर विराजमान श्रील प्रभुपाद येणार्या सर्वांचे स्वागत करतात. मी विचार करीत बसलो असता त्याठिकाणी अचानक हॉस्पिटलचे कर्मचारी एकत्रित जमा झाले.

“हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच मला येथे कार्यरत असणार्या सदस्यांच्या हृदयात व्याप्त सद्भावनेची अनुभूती झाली.” – भारताचे पूर्व राष्ट्रपती, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम.
त्या सर्वांनी एकत्र येऊन एक सुंदर प्रार्थना गायली आणि त्यानंतर छोटेसे प्रवचन देखील झाले. नंतर मला एक सुंदर छोटेसे चालते-फिरते मंदिर दिसले. चाकांवर चालणार्या या मंदिरात भगवान श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रादेवी विराजमान होते. हा रथ दररोज प्रत्येक वॉर्डला भेट देतो, जेणेकरून तेथील रुग्ण आणि कर्मचारी भगवंतांचे दर्शन करून प्रार्थना अर्पण करू शकतील. दु:ख आणि वेदनेने ग्रसित रुग्णांसाठी त्यांच्याजवळ येऊन मिळणारे भगवंतांचे दर्शन किती सांत्वनादायक असेल!

हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच विराजमान असलेला श्रील प्रभुपादांचा सुंदर विग्रह.
सुरुवातीचा काळ
माझी भेट तेथील आध्यात्मिक विभागाचे प्रमुख, श्री रामशरण दास (राजेश कदम) यांच्याशी झाली. या विभागाचे कार्य आहे की त्यांनी रुग्णांना धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक सहाय्यता प्रदान करणे. हॉस्पिटलविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी ते तयार झाले. माझी पहिली जिज्ञासा होती की या हॉस्पिटल योजनेची सुरुवात कशी झाली. रामशरण दास यांनी सविस्तरपणे मला याबाबत माहिती दिली. ही 1986 सालची गोष्ट आहे. त्यावेळी काही एम.बी.बी.एस्. पदवी प्राप्त केलेल्या काही इस्कॉनच्या युवकांनी आदिवासी लोकांची सेवा करण्याची योजना आखली. हे युवक होते – डॉ. अजय संखे (माधवानंद दास), डॉ. विवेकानंद शानबाग (विश्वरूप दास), डॉ. गिरीश राठोड (गिरीराज दास), डॉ. धवल दलाल (द्वारकाधीश दास) तसेच डॉ. बिमल शाह (वैष्णवसेवा दास). सेवा करण्याची उत्कट इच्छा त्यांना पालघर जिल्ह्यातील डुक्टन गावात घेऊन आली. तेथे वैद्यकीय शिबीर लावून लोकांची तपासणी करण्याबरोबर ते भगवन्नामाचे कीर्तन, प्रवचन आणि प्रसादाचे वितरण करू लागले. मफतलाल समुहाचे अध्यक्ष, श्री हृषिकेश मफतलाल (कृष्णचंद्र दास) या युवा डॉक्टरांविषयीची एक आठवण सांगतात, “ज्या आत्मीयतेने ते रुग्णांची सेवा करीत होते, हे पाहून मी अतिशय प्रभावित झालो. हे बुद्धिवान युवक रुग्णांची केवळ चिकित्सा नव्हे तर त्यांच्यासाठी भोजन बनवित, त्यांची सेवा देखील करीत.” काहीतरी चांगली समाजसेवा करण्याच्या इच्छेने ते मुंबईतील मीरा रोड याठिकाणी आले. तेथे त्यांनी काही खोल्यांचा फ्लॅट खरेदी केला आणि 1993 साली ऑपरेशन कक्ष असलेले एक छोटे पॉलिक्लिनीक सुरू केले.

या भक्तांचे समर्पण आणि संकल्प पाहून प्रसिद्ध उद्योगपती, श्री निरंजनलाल दालमिया यांनी मीरा रोड तेथे 1.75 एकर भूमी भक्तांना दान स्वरूपात दिली. अशा प्रकारे या युवा भक्तांमध्ये येथे एक स्वत:चे हॉस्पिटल सुरू करण्याची इच्छा जागृत झाली. अंतत: त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. 11 जानेवारी, 1998 रोजी 100 पलंग असलेेले एक परिपूर्ण हॉस्पिटल यांनी श्रील प्रभुपादांना भेटस्वरूपात अर्पण केले. आज सर्व आद्यावत सुविधांनी सज्ज असलेले हे हॉस्पिटल आपल्या सेवाभावामुळे वाढून आता 200 पलंग असलेले हॉस्पिटल बनले आहे. इतकेच नाही, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील अनेक भागांमध्ये या हॉस्पिटलची उपकेंद्रे देखील चालू करण्यात आली आहेत. काही वर्षांपूर्वी जेव्हा भारताचे पूर्व राष्ट्रपती, डॉ. अब्दुल कलाम हॉस्पिटलच्या हृदयविभागाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते, ते येथील सेवांची गुणवत्ता पाहून अत्यंत प्रभावित झाले. ते म्हणाले, “हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच माझ्या अंत:करणात येथील कर्मचार्यांमधील सद्भावनेची अनुभूती झाली.”
रामशरण दास सांगत असलेली हॉस्पिटलविषयीची माहिती ऐकून मी प्रभावित झालो होतो. याबरोबर माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली की, हे हॉस्पिटल इतर हॉस्पिटलच्या तुलनेत निराळे कसे काय आहे?
एक निराळे हॉस्पिटल
तेव्हा माझी नजर एका डॉक्टरवर पडली. ते अत्यंत लगबगीने हॉस्पिटलमध्ये प्रवेश करीत होते. परंतु, आत येताच स्वागत कक्षातील श्रील प्रभुपादांच्या विग्रहासमोर ते थांबले, पादत्राणे बाजूला काढून त्यांनी श्रील प्रभुपादांना विनम्रपणे नमस्कार केला. त्यानंतर जवळच असलेल्या तुळसीच्या झाडाला काही थेंब पाणी घालून एक फूल अर्पण केले. नंतर परत आपली पादत्राणे घालून ते आपल्या कामासाठी लगबगीने पायर्या चढून वर गेले. डॉक्टरांची दिनचर्या अत्यंत व्यस्त असली तरी कामाची सुरुवात करण्याआधी ते शांत आणि स्थिर भाव ठेवून श्रील प्रभुपादांसमोर नतमस्तक होताना पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. हे दृश्य पाहून केवळ मीच नव्हे तर सभोवतालचे इतर लोक देखील प्रभावित झाले होते.
- वर्णाश्रम
भक्तिवेदान्त हॉस्पिटल तेथे काम करणार्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच इतर सदस्यांसहित तेथे येणार्या प्रत्येकाला आध्यात्मिकतेशी जोडले जाण्याची संधी प्रदान करते. अनेकदा लोक आम्हाला विचारतात की, कशा प्रकारे आपले कार्य किंवा व्यावसाय भगवंतांशी जोडू शकतो? भक्तिवेदान्त हॉस्पिटलमध्ये आल्यावर मी विचार करू लागलो की येथे काम करणारा प्रत्येक भक्त तसेच इतर लोक आपल्या स्वभावानुसार कार्य करीत आहेत, आणि कदाचित् हाच वर्णाश्रम पद्धतीचा उद्देश आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण चार वर्ण आणि आश्रमांविषयी चर्चा करतात. वर्तमान काळात या वर्णाश्रमाचे अस्तित्व जणू संपुष्टात आले असल्याचे दिसते. परंतु, मूळत: वर्णाश्रम व्यवस्थेचा उद्देश आहे की व्यक्ती आपल्या स्वभावानुसार कार्य करीत समाज तसेच भगवंतांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करावे. याच कारणामुळे येथील डॉक्टर, परिचारिका तसेच कर्मचार्यांसह सुमारे 1 हजार लोक प्रसन्नतापूर्वक तसेच तत्परतेने रुग्णांची सेवा करीत आहेत.

श्री हृषिकेश मफतलाल सांगतात, “शेकडो लोक एकत्र काम करणार्या कोणत्याही संस्थेमध्ये नेहमीच मतभेद, वादविवाद असणे स्वाभाविक आहे. परंतु, ज्या परिपक्वतेने तसेच आध्यात्मिक शिकवणींच्या आधारावर येथील लोक कशा प्रकारे सर्व आव्हांना सामोरे जातात, हे विशेषत: पाहण्यासारखे आहे. हॉस्पिटलचे वरिष्ठ संचालक अनेक वर्षांपासून भक्तिमार्गामध्ये संलग्न आहेत; तरीही ते वेळोवळी विनम्रतापूर्वक वरिष्ठ ब्रह्मचार्यांकडून सल्ला घेतात. अशा प्रकारे आपल्याला येथे गृहस्थ आणि ब्रह्मचार्यांमध्ये सुंदर प्रकारचा समन्वय पहावयास मिळतो. हीच या हॉस्पिटलची विशेषत: आहे.”
मी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देत असताना तेथील आध्यात्मिक वातावरण आणि प्रेरणादायक संचालन पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. येथील कर्मचार्यांना भेटून असे वाटत होते जणू मी एका मोठ्या कुटुंबातील सदस्यांना भेटत आहे, जेथे प्रत्येकजण आपली स्थिती व्यवस्थित जाणून आपली भूमिका पार पाडत होते.
- वैष्णवधर्माचा प्रचार
रामशरण दास यांनी मला सांगितले की येथील आध्यात्मिक विभाग हा या हॉस्पिटलचा सर्वात महत्वपूर्ण पैलू आहे. या विभागाने हॉस्पिटलच्या कार्यांना एक नवीन दिशा आणि उद्देश प्रदान केला आहे. या विभागाच्या उपस्थितीमुळे रुग्ण, कर्मचारी तसेच डॉक्टरांमध्ये सखोल परिवर्तन झाले आहे. यापैकी अनेकांनी गंभीरपणे भक्तिमार्गाचा स्वीकार करून पापकर्मांतून स्वत:ला मुक्त केले आहे. रामशरण दास यांनी सांगितले, “मागील 25 वर्षांमध्ये 1286 लोकांनी श्रील प्रभुपादांच्या शिकवणींचा स्वीकार करून सक्रियपणे आध्यात्मिक जीवनाची सुरुवात केली आहे.”

हॉस्पिटलमध्ये येणार्या रुग्ण आणि इतरांसाठी आध्यात्मिक पुस्तकांचे दुकान. एका रुग्णाच्या अंतिम अवस्थेत आध्यात्मिक विभागातील सदस्य भगवद्गीतेचे वाचन करताना.
“1286!” मी अवाक् होऊन म्हणालो. हॉस्पिटलविषयी जाणून घेण्याची माझ्यातील जिज्ञासा आणखीच प्रज्वलित झाली.
येथे येणारे रुग्ण भलेही भगवंतांवर विश्वास ठेवत असो वा नसो, त्यांच्या गरजा आणि इच्छांनुसार त्यांची आध्यात्मिक रूपाने काळजी घेतली जाते. इतकेच नाही, हॉस्पिटलमधून मिळणारी ही सेवा रुग्णांच्या संमतीद्वारेच प्रदान केली जाते, त्यांच्यावर ती थोपविली जात नाही. हॉस्पिटलकडून मिळणारी ही महत्वपूर्ण सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे. यातून हॉस्पिटलची आपल्या आध्यात्मिक उद्देशांबाबतची कटिबद्धता स्पष्टपणे दिसून येते.
धर्माचे चार खांब आहेत – तप, दया, सत्य आणि शौच. भक्तिवेदास्त हॉस्पिटल या चार सिद्धान्तांबरोबर एका पाचव्या सिद्धांतालाही आपले ध्येय मानतो आणि तो सिद्धान्त आहे – हरिनाम संकीर्तन. हॉस्पिटलच्या स्थापनेवेळी प. पू. राधानाथ स्वामींनी कृपापूर्वक हॉस्पिटलच्या संचालकांना या सिद्धांतानुसार कार्य करण्याचा सल्ला दिला होता. आज हा सिद्धान्त हॉस्पिटलमध्ये सेवा करणार्या सदस्यांसाठी एका दिपस्तंभाप्रमाणे कार्य करीत आहे आणि आणि येथे उपचार घेणार्या रुग्णांना देखील आध्यात्मिक प्रकाशाचा किरण प्रदान करीत आहे.
रामशरण दास यांनी मला असे अनेक प्रसंग सांगितले ज्यामध्ये येथे उपचारासाठी आलेले लोक बाहेर पडताना आध्यात्मिक भावना घेऊन बाहेर पडले. यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन बदलले आहे. 1998 सालच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये असाच एक प्रसंग घडला होता.

हॉस्पिटलमधील मंदिरात विराजमान भगवान् जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रादेवीचे श्रीविग्रह.
हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात विलियम्स् नामक रुग्ण भरती झाला होता. तो कोमा अवस्थेत गेला होता. दिवसेंदिवस त्याची जगण्याची आशा संपुष्टात येत होती. त्यावेळी आध्यात्मिक विभागातील एक वरिष्ठ सल्लागार, दामोदर पंडीत दास यांनी त्याच्या कुटूंबातील सदस्यांशी चर्चा करून रुग्णाजवळ बसून नियमितपणे हरिनामाचा जप, शास्त्रपठन तसेच रुग्णाबरोबर प्रत्यक्ष चर्चा करून त्याचा आध्यात्मिक उपचार देखील सुरू केला. विलियम्स्मध्ये जीवनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. अनेक दिवस असेच चालू राहिल्यावर अंतत: विलियम्स्ने हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर चौदा दिवसांनंतर अचानक आपले डोळे उघडले. अस्पष्ट आवाजात तो म्हणाला, “तुम्ही जे काही शास्त्रपठन करीत होता किंवा नामजप करीत होता, ते सर्व मी ऐकत होतो. या पवित्र नामजपाचा ध्वनी ऐकून परमेश्वराकडून मला शक्ती प्राप्त होत होती.” पुढे एक आठवड्यानंतर विलियम्स् स्वत:च्या पायावर उभे राहून घरी परतला. ही एक ऐतिहासिक घटना आहे, जी सिद्ध करते की कशा प्रकारे औषधांबरोबर आध्यात्मिक काळजी देखील रुग्णाचे स्वास्थ ठीक करण्यात योगदान देते. खरेच, ही गोष्ट एका चमत्काराप्रमाणेच वाटली!
प्रेम आणि करुणापूर्ण सेवा
हॉस्पिटलमधील निरनिराळ्या विभागांना भेट देत असताना मी देखील पवित्रतेचा अनुभव केला. मी विचार करू लागलो की या हॉस्पिटलने निश्चितपणे लोकांच्या मनात खोलवर छाप सोडली असेल. हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावर पोहचल्यावर मी तेथील सभागृहाच्या बाहेर दोन भिन्न कार्यक्रमांची पोस्टर्स पाहिली. माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले की हॉस्पिटलमध्ये या विषयांबाबत काय माहिती दिली जाईल. पहिला विषय जीवात्म्याच्या जन्मापासून आरंभ होतो आणि दुसरा त्याच्या या जगातील अंतिम यात्रेबाबतचा होता. मला आत जाऊन या कार्यक्रमात जाऊन बसण्याचा निश्चय केला.
गर्भाधान संस्कार
प्रवचनकर्ता एका अशा दांपत्याची कथा सांगत होते ज्यांना विवाहानंतर अनेक वर्षांपर्यंत संतानप्राप्ती झाली नव्हती. दोघा पती-पत्नीने हॉस्पिटलच्या आयुर्वेदिक विभागात येऊन आपली तपासणी करण्याचा निश्चय केला. तेव्हा त्यांनी गर्भाधान संस्कारासाठी आपले नाव नोंदविले. हा संस्कार म्हणजे केवळ उपचार नाही तर यामध्ये गर्भाधानाच्या तीन महिन्यांपूर्वी पती-पत्नीला मानसिक तसेच शारीरिकरीत्या गर्भाधानासाठी तयार केले जाते. परिणाम काय, तर आयुर्वेदिक औषधे तसेच आध्यात्मिक कार्यांच्या संगनमताने त्या महिलेचे सफलतापूर्वक गर्भाधान झाले! ही काही साधारण गोष्ट नव्हती.

गर्भाधान संस्कार कार्यक्रमात दांपत्यांना काही विशेष मंत्रांचे उच्चारण, काही विशेष ध्वनींचे श्रवण तसेच कशा प्रकारे गर्भात विकसित होणार्या आत्म्याचे संरक्षण करावे, याबाबत माहिती दिली जाते. अंतत: आध्यात्मिक प्रवृत्तीने युक्त तसेच मानसिक रूपाने स्थित अशा प्रसन्नचित्त बालकाचा जन्म होतो. परंतु, यानंतर ही यात्रा येथेच थांबत नाही. ‘बालसंगोपन’ कार्यक्रमान्तर्गत पाच वर्षांपर्यंत शिशूचे पालन करण्याची पद्धत शिकविली जाते, जेणेकरून त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, त्यांची बुद्धी तीक्ष्ण होईल, त्याच्या व्यवहारात सत्त्वगुणाचा प्रभाव वाढेल आणि त्याचा सर्वांगिन विकास होऊ शकेल. उत्तम संतानाची इच्छा करणार्या पालकांना एक अशी जीवनशैली दिली जाते जेणेकरून ते आपल्या शरीराला शुद्ध करून शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक स्तरावर बळ प्राप्त करू शकतील.


आणि, जसे मी अपेक्षा केली होती, कार्यक्रमानंतर लोकांच्या उत्स्फूर्त टाळ्यांच्या गडगडाटाने संपूर्ण सभागृह दणाणून गेले.
सम्मानपूर्वक अंतिम यात्रेची तयारी
सभागृहाबाहेर आल्यावर मी रामशरण दास यांना विनंती केली की त्यांनी संक्षेपात सभागृहातील दुसर्या विषयाबाबत (मृत्यूची तयारी) माहिती द्यावी. मी जाणत होतो की या कार्यक्रमान्तर्गत रुग्णांबरोबर अत्यंत सहानुभूतीपूर्वक व्यवहार केला जातो जेणेकरून मृत्यूवेळी ते भयभीत नसावेत आणि त्यांच्या कुटुंबियांना भविष्यात येणार्या भावनात्मक आव्हानांसाठी तयार केले जाते.

याबाबत माहिती देत असताना रामशरण दास यांनी मला नजमा शेखची कथा सांगितली. नजमाचा घटस्फोट झाला होता. तिला संतान नव्हती तसेच तिच्याकडे नोकरी देखील नव्हती. ती पूर्णपणे आपल्या भावावर आश्रित होती. तिला कर्करोग झाला होता. हॉस्पिटलमध्ये मला जाणवले की येथे विभिन्न धर्म तसेच मत असणार्या रुग्णांचा सम्मान केला जातो आणि त्यांच्याबरोबर केला जाणारा व्यवहार आत्म्याच्या गरजांवर केंद्रित तसेच समस्त धार्मिक सीमांच्या पलीकडील होता.
नजमाला आपल्या उर्वरीत जीवनात कोणत्याही सुखाची आशा नव्हती आणि भिंतीवरील घड्याळ तिला एखाद्या टाईम बाँबप्रमाणे वाटत होते. डॉक्टरांनी सर्व आशा सोडल्या होत्या, मात्र नजमाने परमेश्वराप्रति कृतज्ञता व्यक्त करीत नशीबाचा सामना करण्याचा निश्चय केला होता. आपल्या भावाबरोबर रहात असताना तिने भक्तिवेदान्त हॉस्पिटलच्या डिपार्टमेंट ऑफ पॅलेटिव्ह केअर एँड हॉसपिस (मरणासन्न अथवा मृत्यूनजीक आलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेणारा विभाग) विभागाची सहाय्यता घेण्याचे ठरविले. नजमाचा भगवंतांवर विश्वास होता आणि विस्तृत मानसिकता असल्याने ती भगवान तसेच अल्लाह यांना एकच मानत होती. ती सदैव भगवंत, त्यांचे भक्त तसेच भक्तीबाबत ध्यानपूर्वक ऐकत असे.
कुराणाबाबत तिचे अनुभव ऐकून आम्ही आश्चर्यचकीत झालो. रामशरण दास उत्साहपूर्वक नजमाची कथा सांगत होते. ते म्हणाले, “पॅलेटिव्ह केअर विभागाचा सदस्य असल्याने मी एके दिवशी नजमाच्या भावाच्या घरी गेलो. नजमा भक्तांच्या येण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची वाटच पहात होती. परंतु, तिचा भाऊ आणि बहिण भक्तांकडे शंकाग्रस्त नजरेने पहात होते. आम्ही दोघा भावा-बहिणीमधील सर्व शंकांचे समाधान केले. आम्ही त्यांना विश्वास दिला की नजमा आमच्यासाठी सख्ख्या बहिणीप्रमाणे आहे आणि केवळ ‘हॉसपिस’मधील रुग्ण असल्याने तिला भेटण्यासाठी येत होतो. हळूहळू तिच्या कुटूंबातील सर्वजण आश्वस्त झाले आणि इतक्या दिवसांतील तणान दूर झाला. मी जेव्हा कधी नजमाला भेट देत असे, तेव्हा ती नेहमी आमच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत असे.
“दिवसागणिक तिचा रोग वाढतच गेला. जीवनातील शेवटच्या दोन महिन्यात तिने घरात बनविलेले भोजन खाणे बंद केले आणि केवळ भक्तिवेदान्त हॉस्पिटलमधील भोजनालयात बनलेेले भोजनच मागवून खात असे. नजमाला भेटत असू तेव्हा ती केवळ अल्लाहच्या दयाळू स्वाभाविषयी बोलत असे. तिला पूर्ण विश्वास होता की जीवनात येणारे कष्ट देखील अल्लाहची कृपाच आहे, कारण या कष्टांमुळेच ती प्रतिक्षण त्यांचे स्मरण करू शकत होती.
“आमची तीव्र इच्छा होती की शरीर त्यागण्याआधी तिला आम्ही गंगाजळ आणि तुलशीदल देऊ शकू आणि तिच्यासाठी हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करू शकू. परंतु, तिच्या कुटुंबियांच्या अनुमतीविना आम्हाला हे करायचे नव्हते.

“जेव्हा भगवान जगन्नाथांचा रथ तिच्या स्टे्रचरसमोर आला, नजमा काहीवेळ एकटक भगवंतांकडे पहात राहिली. रथाबरोबर असलेल्या भक्ताने तिच्या हातात जगन्नाथांना अर्पण केलेेले प्रसादी फूल दिले. नजमाने ते कृतज्ञतापूर्वक आपल्या माथ्यावर लावले. आता तिच्याकडे शेवटचे काही तासच बाकी होते. तिने ते फूल आपल्या हातातच ठेऊन ती घरी निघून गेली.
“तिच्या भाऊ-बहिणीबरोबर माझे चांगले संबंध निर्माण झाल्याने आणि याचा लाभ घेत मी नजमासाठी उच्चस्वरामध्ये पाच माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप केला. पाचवी माळा संपल्यावर मी जसे तेथून उठलो, नजमा माझा हात पकडून म्हणाली, “तूच माझा खरा भाऊ आहेस. माझ्यासाठी जे काही केलेस त्याबाबत धन्यवाद!” मी म्हणालो, “तू मला भाऊ मानले असेल तर तुला धन्यवाद देण्याची आवश्यकता नाही.” दुसर्या दिवशी आम्हाला तिच्या देहांताची बातमी मिळाली.
नजमाची कथा समाप्त करीत रामशरण दास गर्वाने म्हणाले, “जीवनाच्या प्रत्येक वळणावर तसेच प्रत्येक संकटमय स्थितीत आम्ही या हॉस्पिटलमध्ये श्रील प्रभुपादांचा आश्रय घेणार्या प्रत्येक व्यक्तीची प्रेम, करुणा आणि भक्तीपूर्वक काळजी घेण्यासाठी तत्पर आहोत.” हा खरा वैष्णव-धर्माचा प्रचार आहे.
- वैष्णव सेवा
तेथून पुढे जात असता रामशरण दास यांनी मला विचारले, “आपण प. पू. महाविष्णू स्वामींविषयी ऐकले आहे का?”
मी म्हणालो, “हो, नक्कीच! ते इस्कॉनमधील एक दीक्षा गुरू होते.”

श्रील प्रभुपादांची शिष्या, श्रीमती शचीमाता देवी दासी या श्रीधाम मायापूरहून आलेल्या श्री नित्यानंद प्रभूंच्या पादुकांचा आशीर्वाद प्राप्त करताना.
“हो, तेच. वयाच्या 94 वर्षांपर्यंत ते कधीच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले नव्हते तसेच त्यांनी कोणतीही अॅलोपॅथिक औषधे घेतली नव्हती. त्यांच्या या पाश्चिमात्य चिकित्सा पद्धतीवर तितका विश्वास नव्हता. आता वृद्धापकाळामुळे त्यांची तब्येत खालावत चालली होती. ते सर्वाधिक नासिकमध्ये प्रचार करीत आले असल्याने भक्तांनी त्यांना नासिकमध्ये नेण्याचे ठरविले. परंतु, महाराजांनी ते अमान्य केले. ते म्हणाले की त्यांना भक्तिवेदान्त हॉस्पिटलमध्येच शरीराचा त्याग करायचा आहे कारण हे हॉस्पिटल श्रीधाम वृंदावनाहून अभिन्न आहे.”
भक्तांचे आशीर्वाद
(वैष्णव कृपा)
हॉस्पिटल संचालकांना पूर्ण विश्वास आहे की मागील 25 वर्षांतील हॉस्पिटलला मिळालेेले यश हे केवळ श्रील प्रभुपादांचे शिष्य, वरिष्ठ भक्त तसेच शुभचिंतकांच्या कृपेमुळे प्राप्त झाले आहे. रामशरण दास यांनी सांगितले की, येथे येणार्या वैष्णवांचा आशीर्वाद तसेच त्यांचे उत्साहवर्धक वचनांमुळे आम्हाला मनापासून रुग्णांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी मला एक वहीदेखील दाखविली ज्यांमध्ये भक्तांनी हॉस्पिटलबाबत आपले आभार व्यक्त केले आहेत. त्यातील काही भक्तांची वचने आम्ही येथे प्रस्तुत करीत आहोत –
प. पू. गोपालकृष्ण गोस्वामी

“मुंबईतील भक्तिवेदान्त हॉस्पिटलने भक्तांची अद्भुत सेवा केली आहे आणि त्यांच्या आध्यात्मिक, भावनात्मक, भौतिक, मानसिक तसेच शारीरिक गरजांकडे ध्यान दिले आहे. हॉस्पिटलच्या सुरुवातीपासून मला याठिकाणी अनेकदा येण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. याठिकाणी दिली जाणारी सेवा ही अद्वितीय आहे.”
श्रीमती यमुना देवी

“याठिकाणी येऊन मी भावविभोर झाली आहे. भक्तिवेदान्त हॉस्पिटलमधील भक्तांची भक्ती खरोखरच अवर्णनीय आहे. याठिकाणी 24 तास तुमच्या कानात श्रील प्रभुपादांच्या आवाजातील कीर्तन किंवा प्रवचन ऐकावयास मिळेल. हॉस्पिटलमधील प्रत्येक विभाग कृष्णभक्तीच्या तरंगांनी व्याप्त आहे. येथे प्रत्येक खाद्यपदार्थ भगवंतांना भोग दाखविला जातो आणि नंतर प्रसादरूपात त्याचे सर्वांना वितरण होते. याशिवाय आणखी काय सांगू?”
प.पू.जयपताका स्वामी

“मैं विभिन्न प्रकार के उपचार हेतु भक्तिवेदान्त अस्पताल आया। ये लोग मेरी अच्छी देखभाल कर रहे हैं और असंख्य लोगों के हृदयों को स्पर्श कर रहे हैं।”

प. पू. गिरीराज स्वामी
“मी भक्तिवेदान्त हॉस्पिटलच्या कार्यांद्वारा अत्यंत प्रसन्न आणि संतुष्ट आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येथे ज्याप्रकारे श्रील प्रभुपादांच्या भक्तांची काळजी घेतले, हे पाहून श्रील प्रभुपाद निश्चितच प्रसन्न असतील.”
प. पू. जयपताका स्वामी

“मी निरनिराळ्या प्रकारच्या उपचाराकरिता भक्तिवेदान्त हॉस्पिटलला भेट दिली आहे. येथे माझी उत्तमरीत्या काळजी घेतली गेली आहे. येथील भक्तांच्या सेवाभावनेने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.”
प. पू. लोकनाथ स्वामी

भक्तिवेदान्त हॉस्पिटल एक अतुलनीय मंदिर-हॉस्पिटल आहे. अशा प्रकारचे हॉस्पिटल मी जगात कुठेच पाहिलेले नाही. मला पूर्ण विश्वास आहे की येथील कार्यांमुळे श्रील प्रभुपाद निश्चितच प्रसन्न असतील. या जगातील सर्वांना येथील सेवांची गरज आहे.”
श्रीमान् अंबरीष दास (अल्फ्रेड बी. फोर्ड)

“माझा अनेक वर्षांपासून मुंबईतील भक्तिवेदान्त हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संबंध आहे. हे माझे परम सौभाग्य आहे. मी मनापासून विनंती करतो की आपली ही सुंदर परियोजना दिवसागणिक पुढे अशीच वाढत राहो.”

मी त्वरित समजून चुकलो की वैष्णव सेवा हा भक्तिवेदान्त हॉस्पिटलचा सर्वात प्रमुख उद्देश आहे. हे हॉस्पिटल अशा भक्तांच्या सेवेप्रति समर्पित आहे ज्यांनी संपूर्ण जीवन श्रील प्रभुपादांच्या आंदोलनाप्रित्यर्थ समर्पित केले आहे. या हॉस्पिटलमध्ये ‘इस्कॉन डिव्होटी हेल्थकेअर’ नावाने एक विशेष कार्यक्रम राबविला जातो, ज्याचा उद्देशच भगवद्भक्तांची उत्तम सेवा करणे आहे.
रामशरण दास यांनी सांगितले, “हॉस्पिटलचे निर्देशक तसेच संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या माधवानंद दास यांनी शिकविले आहे की जीव-दया अर्थात, सर्व प्राणिमात्रांप्रति करुणाभाव ठेवणे, हे वैष्णव सेवेचे प्रमुख अंग आहे. हॉस्पिटलमध्ये सेवा करताना आम्ही प्रत्येक व्यक्तीकडे श्रील प्रभुपादांचा व्यक्तिगत अतिथी असल्याचे पाहून अत्यंत सावधपणे त्यांच्या सर्व गरजांकडे लक्ष देतो. त्यांना असे जाणवले पाहिजे की ते हॉस्पिटलमध्ये नव्हे तर आपल्याच दुसर्या एका घरात आलो आहोत.” त्यांची ही गोष्ट अत्यंत हृदयस्पर्शी होती. या सेवाभावनेमुळेच आज लाखो लोकांनी भक्तिवेदान्त हॉस्पिटलमधील आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला आहे.
आरोग्यापलीकडील आपलेपण

भक्तिवेदान्त हॉस्पिटलमध्ये पैशांपेक्षा रुग्णांच्या जीवनाकडे अधिक लक्ष दिले जाते. येथे निर्धन कुटूंबांकरिता नि:शुल्क उपचाराची देखील सुविधा आहे. असे अनेक प्रसंग आहेत जेथे भक्तिवेदान्त हॉस्पिटलने स्वत:हून पुढे येत गरजू रुग्णांची मदत केली आहे. मग भले 45 वर्षीय राजू शेट्टी असो, जे कर्करोगाने ग्रस्त होते आणि हॉस्पिटलने केलेल्या मदतीमुळे ते भगवंतांच्या भक्तिप्रति आकर्षित झाले; किंवा, रचना घाग असो जिची दोन्ही मुले, शैली आणि गौरव यांना हॉस्पिटलने दोघा माता-पित्यांच्या मृत्यूनंतर आश्रय दिला आहे. असे देखील अनेक प्रसंग आहेत जेथे हॉस्पिटलमधील भक्त समुहाने रुग्णांद्वारा शरीर सोडण्यापूर्वी त्याच्या कुटूंबातील मतभेद मिटविले आहेत.
हे सर्व पाहून हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की भक्तिवेदान्त हॉस्पिटल रुग्णाच्या आरोग्यापलीकडे जाऊन सेवा करीत आहेत. मी हे स्पष्टपणे पाहू शकत होतो की दशकांपूर्वी प. पू. राधानाथ स्वामींनी वर्णाश्रम, वैष्णव धर्माचा प्रचार तसेच वैष्णव सेवा याबाबत दिलेल्या सिद्धान्तांचे भक्तिवेदान्त हॉस्पिटल तंतोतंतपणे पालन करीत आहे.
रामशरण दास यांचे आभार व्यक्त करून मी कृतज्ञता तसेच प्रसन्न अंत:करणाने हॉस्पिटलमधून परतण्याची तयारी करू लागलो. तेव्हा अचानक मला एका वरिष्ठ इस्कॉन भक्ताची आठवण झाली, जे नेहमी विचारत, “श्रील प्रभुपादांनी मंदिरांची स्थापना करण्यासाठी सांगितले आहे, हॉस्पिटल उभारण्यास सांगितले नाही. मग, इस्कॉनने हॉस्पिटल उभारण्याची काय आवश्यकता आहे?” परंतु, जेव्हा त्यांच्या जीवनात प्राणघाती रोगाने आक्रमण केले आणि या भक्तिवेदान्त हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार यशस्वीपणे पार पडला, तेव्हा ते म्हणाले, “माझी सर्वात मोठी चूक होती की इस्कॉनमध्ये हॉस्पिटलची गरज मी समजली नाही. हे एकमात्र ठिकाण आहे जेथे अॅलोपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार तसेच प्राणिक हिलिंग सारख्या विविध उपचार पद्धतींद्वारे केवळ आरोग्य नव्हे तर सद्भावना आणि भक्ती देखील प्राप्त होते.”
अंतत: ते म्हणाले, “इस्कॉननी अशी अनेक भक्तिवेदान्त हॉस्पिटल उभारली पाहिजेत.” आणि, मी त्यांच्या या वाक्याशी पूर्णपणे सहमत होतो.
मुकुंदमाला दास प. पू. राधानाथ स्वामींचे शिष्य असून ते इस्कॉन मुंबई येथील चौपाटी मंदिरात ब्रह्मचारी आहेत. ते ‘बॅक टू गॉडहेड’ या इंग्रजी मासिकाच्या संपादकीय मंडळाचे सदस्य आहेत.
अधिक वाचण्यासाठी
BTG डिजिटल मासिकाची सदस्यता घ्या
BTG डिजिटल मासिकासह कृष्णभावनेच्या तुमच्या मार्गावर जा! आत्ताच सदस्यता घ्या आणि आमच्या समुदायाद्वारे सामायिक केलेल्या वाढ, ज्ञान आणि कनेक्शनच्या प्रेरणादायी कथा शोधा.

